कोपरगाव : नवरात्रोत्सवात “माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान” (दि. २६ सप्टेंबर ते ०५ ऑक्टोबर २०२२)
नवरात्रोत्सवाच्या काळात कोपरगाव तालुक्यातील महिलांच्या सर्वांगीन आरोग्य तपासणीचा महत्वाकांक्षी प्रकल्प आरोग्य विभागाने हाती घेतला आहे. ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित या संकल्पने अंतर्गत दि. २६ सप्टेंबर ले ०५ ऑक्टोबर २०२२ या काळात १८ वर्षावरील सर्व मातांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
प्रामुख्याने घरातील स्त्री आरोग्य दृष्ट्या सशक्त असेल तर घर सुरक्षित ही संकल्पना घेऊन नवरात्रोत्सवाच्या काळात ही योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली आहे. आरोग्य विभागाबरोबरच नगरपालिका, आदिवासी तसेच महिला व बाल विकास विभागाची मदत घेण्यात येणार आहे.
तालुक्यातील ग्रामिण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे तसेच अंगणवाडी केंद्रात यासाठी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहे. सकाळी ९:०० ते दुपारी २:०० अशी शिबाराची वेळ असुन स्त्री रोग तज्ञांसह खाजगी डॉक्टरांनाही या उपक्रमात सहभागी करुन घेतले जाणार आहे.
यामध्ये सर्व थरातील महिलांसाठी योग सेशन, ३० वर्षावरील सर्व महिलांचे मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, ग्रीव्हेचा कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब याकरीता तपासणी करण्यात येणार आहे. तसेच १८ वर्षावरील सर्व महिलांचे उंची व वजनाचे मोजमाप, रक्तगट, हिमोग्लोबीन व इतर रक्त तपासणी करण्यात येणार आहे. कोवीड लसीकरण गरोदर मातांकरीता टी.डी.चे लसीकरण करण्यात येणार आहे. वजन वाढ, पोषण आहार, कुटुंब नियोजन पध्दती, व्यसन मुक्ती याबाबत समुपदेशन करण्यात येणार आहे.
अतिदुर्गम भागात प्रामुख्याने आदिवासी क्षेत्रात आरोग्य विभागाच्या भरारी पथकातील डॉक्टरांच्या माध्यमातुन पाड्यावर तसेच वाडी वस्तीमध्ये जाऊन आरोग्य तपासणी केली जाणार आहे. नवरात्रोत्सवातील तीन दिवस हे जास्तीत जास्त गर्भवती महिलांच्या सोनोग्राफी चाचणीसाठी देण्यात येणार आहे. महिलांच्या आरोग्यासाठी आवश्यक त्या सर्व चाचणी व तपासणी या काळात करण्यात येणार असुन आवश्यकतेनुसार प्रतिबंधात्मक तसेच उपचारात्मक आरोग्य सुविधाही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
१८ वर्षावरील सर्व महिलांनी या अभियानामध्ये सहभाग घ्यावा.
असे आवाहन, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्री. विकास घोलप , प्रा. आरोग्य केंद्र आरोग्य अधिकारी डॉ. श्री.नितीन बडदे, डॉ.श्री.सुनील मोरे, डॉ. श्री. राजेंद्र पारखे, डॉ. श्री. अनिरुद्ध तोडकर, डॉ. श्री. अनिकेत खोत, तसेच समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. रेणू नागरे, डॉ. अयुब शेख, डॉ सौ. तोडकर, डॉ. किरण भागवत, डॉ. अक्षय गायकवाड, डॉ. संतोषी पावडे, डॉ. सुधीर वाणी, डॉ. गणेश म्हस्के, डॉ. सोनाली पानसरे, डॉ. सुवर्णा काळे, डॉ. नेहा वाघमारे, डॉ. संकेत पोटे, डॉ. वर्षा मेमाने, डॉ. ढाकणे, रविंद्र इंगळे, सुनीता बिडवे, सौ. वाघ, सौ. आरखडे, सौ. माळी, सौ. आवारे यांनी केले आहे. अनेक आरोग्य सेवक या अभियानात परिश्रम घेत आहेत.