देश महासत्ता करण्यासाठी कुणाशी लढाई करावी लागणार नाही. घरापासून सुधारणा होऊन व्यक्ती, कुटूंब आणि गाव आत्मनिर्भर करण्याची गरज आहे. सर्वप्रथम ग्रामीण भागात सुधारणा आवश्यक आहे. शंभर वर्षांचे आरोग्य मिळण्यासाठी स्वच्छ हवा, पिण्यासाठी शुद्ध पाणी आणि चांगले अन्न मिळाले पाहिजे. शिक्षण , स्वच्छता, निराधार वृद्धांचा सन्मान पूर्वक सांभाळ गावाने करावा. यासाठी योग्य नेतृत्व मिळाले तर समाजात सकारात्मक बदल घडतो, असे मत भास्करराव पेरे-पाटील (पाटोदा) यांनी कोपरगाव येथील कार्यक्रमात व्यक्त केले.
संजीवनी उद्योग समूहाचे वतीने नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना मार्गदर्शन साठी भास्करराव पेरे पाटील यांच्या भाषणाची मेजवानी मिळाली.
लोक आरोग्यपूर्ण आणि दीर्घायुष्य जगले पाहिजेत म्हणून त्या दृष्टीने गावात असे वेगळे काम केले. आता पाटोदा गाव बघण्यासाठी शासनातील आणि देशभरातून इतर गावांतील लोक येतात.
मूल जन्माला आले की, त्याला प्रथम आईच्या दुधाऐवजी ऑक्सिजन लागतो.
शहरात झाडांची संख्या कमी झाल्याने कोरोणा काळात मृत्यू दर वाढला. तुलनेत ग्रामीण भागात मृत्यू कमी झाले. झाडांमुळे हे शक्य आहे. झाडे म्हणजे पावसाचे एटीएम आहे. प्रत्येक माणसामागे चार झाडे लावणे आवश्यक आहे. असे मौल्यवान मार्गदर्शन कोपरगाव तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार प्रसंगी केले.
यावेळी कारखान्याचे चेअरमन विवेक भैय्या कोल्हे, कारखान्याचे सर्व संचालक तालुक्यातील राजकीय क्षेत्रातील अनेक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.
अभ्यासपूर्ण, पण ग्रामीण बाज असणारे भास्करराव पेरे पाटील यांच्या भाषणाला श्रोते नेहमीच दाद देतात. त्यांचे कार्य महानच आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना प्रेरणा देणारा त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास आहे. परंतु भाषण अधिक रंजक करण्याच्या नादात महिलांना अपमानास्पद वाटेल असे वक्तव्य त्यांनी टाळायला हवे. अशी अपेक्षा बाळासाहेबांची शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ. विमल पुंडे यांनी व्यक्त केली.