कोपरगाव : कोव्हीड- 19 च्या काळात केलेल्या अविस्मरणीय कामाची दखल घेत WHO ने ग्लोबल हेल्थ लीडर अवॉर्ड 2022 साठी भारतातल्या आशा वर्कर्सची निवड करण्यात आली. तेंव्हा १० लाखांपेक्षा अधिक महिला भारतातल्या ग्रामीण भागतल्या आरोग्यासाठी दररोज काम करत आहेत. याची समस्त भारतीयांना जाणीव झाली. त्या सर्व आशांचा या माधम्यातून सन्मान करण्यात आला आहे.
कोण आहेत आशा..?
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत आशा स्वयंसेविका योजना राबवण्यात येते.
आरोग्य हा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असून आरोग्य यंत्रणा, सेवाभावी संस्था ग्रामस्थ आणि समाजातील अन्य घटकांमध्ये आरोग्या संदर्भात जनजागृती करणे, सुसंवाद घडवून समन्वय करणे, प्रोत्साहन देणे, वाटाघाटी निर्माण करणे यादृष्टीने ‘आशा स्वयंसेविका’ महत्त्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून काम करतात. आशा स्वयंसेवक ही गावातील स्थानिक असते. आशा स्वयंसेवकाकडून गावातील आरोग्य विषयक समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी नेतृत्वाचे योगदान दिले जाते.
राज्यभरात साधारण ७० हजार पेक्षा अधिक आशा स्वयंसेवक कार्यरत आहेत. आदिवासी जिल्ह्यांमध्ये एक हजार लोकसंख्येमागे एक आशा स्वयंसेवक नियुक्त आहे. तर बिगर आदिवासी जिल्ह्यात 1500 लोकसंख्येमागे 1 आशा स्वयंसेवक नियुक्त आहे.
साथीच्या रोगाबाबत जनजागृती आणि उपचारासाठी मदत करणे, कुटुंब कल्याण योजनेचा प्रचार करणे, माता आणि बाल आरोग्याविषयी प्रबोधन करणे (उदाहरणार्थ, प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण, स्तनपान, लोहयुक्त गोळ्या देणे, योग्य आहार घेणे), जन्म आणि मृत्यू नोंदणीमध्ये मदत करणे, किरकोळ आजारांवर औषधं देणे अश्या जबाबदार्या आशा स्वयंसेवकांवर आहेत.
या आशांना घरची सगळी कामं उरकून सकाळी साडेआठ वाजता कामाच्या ठिकाणी पोहचावं लागतं. कधी लसीकरणाची ड्युटी असते, तर कधी गावात जाऊन जनजागृती करण्याची.वेग वेगळे सर्वे करण्यासाठी घर आणि कामाचं ठिकाण ३ / ४ किलोमीटर पेक्षा अधिक अंतरावर कामासाठी जावा लागतं.
आशा वर्कर्सचं’ सर्वांनीच कौतुक केलं आहे. पण फक्त कौतुकाने पोट भरत नाही. आशा वर्कर्सना असंख्य अडचणींना सामोरं जावं लागतय.
दीड वर्षात साधारण तीन हजारांहून अधिक आशांना आणि कुटुंबियांना कोरोनाची लागण झाली. काहींनी बलीदान दिले. त्यांना मूलभूत सुविधाही सरकारकडून मिळत नसल्याचं आशा स्वयंसेविकांचं म्हणणं आहे.
कोरोना सारख्या संकट काळात जोखमीचं काम करणाऱ्या, व नंतरही आरोग्यासाठी परिश्रम घेत असलेल्या या सर्व आशा स्वयंसेवकांना मानाचा मुजरा..
या आशा स्वयं सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा. त्याचबरोबर त्यांच्या कष्टांचा सन्मान वाढेल असं मानधन त्यांना देण्यात यावं ही समाजामधुनही मागणी आहे.